अटल बोगद्याच्या उद्घाटनानंतर ७२ तासांत तीन अपघात; सेल्फी, रेसिंगसाठी चालकांचा निष्काळजीपणा

हिमाचल प्रदेशातील रोहतंग येथे तयार करण्यात आलेल्या जगातील सर्वाधिक उंचीवरील आणि लांब अटल बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर रोजी लोकार्पण झालं. या बोगद्यामुळं मनाली आणि लेह दरम्यानच ४६ किमी अंतर कमी झालं आहे. वाहनांसाठी चांगली सोय झाल्याने उद्घाटनंतर ७२ तासांतच पर्यटकांनी या बोगद्यात अतिवेगात आणि निष्काळजीपणानं वाहनं चालवल्याचं दिसून आलं आहे. यामुळे अपघातांच्या तीन घटनाही येथे घडल्या आहेत. आऊटलुकने याबाबत वृत्त दिलं आहे.

हिमाचलमध्ये पर्यटकांसाठी अटल बोगदा नवं पर्यटनाचं केंद्र बनलं आहे. मात्र, वाहनांचे अपघात ही आता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसाठी (बीआरओ) नवी डोकेदुखी बनू पाहत आहे. कारण, या बोगद्यात पर्यटक आणि वाहनचालक हे वेगानं वाहनं चालवताना तसेच कार्सच्या रेस लावताना दिसत आहेत. तसेच बोगद्याबाहेर आणि बोगद्यात सेल्फी घेत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत.

३ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन झाल्यानंतर एकाच दिवसांत या बोगद्यात तीन अपघात झाले. यावेळी वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. काही जण तर या नव्या बोगद्यात वेगाने ड्रायव्हिंग करताना सेल्फी देखील घेत आहेत, अशी माहिती बीआरओचे मुख्य अभियंता ब्रिगेडियर के. पी. पुरुषोत्तम यांनी दिली. या बोगद्यामध्ये वाहनांना थांबण्यास परवानगी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बीआरओने बोगद्यात पोलिसांची गस्त ठेवण्याची मागणी केली आहे. उद्घाटनानंतर या बोगद्यात काही प्रमाणात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आता ती देखील अपुरी आहे. अतिवेगात वाहनं चालवणाऱ्यांमध्ये पंजाब, हरयाणा आणि चंदीगड येथील वाहनचालकांचा समावेश असल्याचं ब्रिगेडियर पुरुषोत्तम यांनी सांगितलं. त्याचबरोबर या महामार्गालगतच्या गावांजवळ पर्यटक आपल्यासोबत आणलेल्या वस्तू वापरुन झाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला फेकून देत कचरा करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

कुल्लूचे जिल्हा पोलीस प्रमुख एस. पी. गौरवसिंह म्हणाले, अटल बोगद्यात वाहनांच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. राम लाल मरकंडा यांनी देखील जिल्हा प्रशासनाला याकडे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

बोगदा सकाळी आणि संध्याकाळी काही काळ बंद राहणार

दरम्यान, बीआरओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बोगदा जनतेसाठी दररोज सकाळी ९ ते १० वाजता आणि संध्याकाळी ४ ते ५ वाजता बंद राहणार आहे.