IPL 2020 : संजू सॅमसन, तेवतियाची दमदार कामगिरी, राजस्थानचा चेन्नईवर विजय

शारजाह : संजू सॅमसन आणि राहुल तेवतियाच्या दमदार कामगिरीमुळे राजस्थानने चेन्नईचा १६ रनने पराभव केला आहे. राजस्थानने ठेवलेल्या २१७ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली. मुरली विजय आणि शेन वॉटसनने चेन्नईला ६.४ ओव्हरमध्ये ५६ रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. पण यानंतर लगेचच दोघंही माघारी परतले.

 

पहिल्या दोन विकेट पडल्यानंतर राहुल तेवतियाने लागोपाठ २ बॉलला चेन्नईच्या २ विकेट घेतल्या. यामुळे चेन्नईची अवस्था ७७-४ अशी झाली होती. यानंतर फॅफ डुप्लेसिस आणि केदार जाधवने चेन्नईचा डाव सावरायला सुरुवात केली. पण एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणं चेन्नईला जमलं नाही. फॅफ डुप्लेसिस ३७ बॉलमध्ये ७२ रन करून माघारी परतला.

 

सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या धोनीने १७ बॉलमध्ये नाबाद २९ रनची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीने लागोपाठ ३ सिक्स मारले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ आणि टॉम कुरनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

 

टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली. राजस्थानचा ओपनर यशस्वी जयस्वाल ६ रन करून माघारी परतला, पण स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनने आक्रमण सुरूच ठेवलं. संजू सॅमसनने ३२ बॉलमध्ये ७४ रन केले. तर स्मिथ ४७ बॉलमध्ये ६९ रन करून आऊट झाला. जोफ्रा आर्चरने नवव्या क्रमांकावर येऊन ८ बॉलमध्ये २७ रनची धडाकेबाज खेळी केली.

 

चेन्नईकडून सॅम कुरनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर दीपक चहर, लुंगी एनगिडी आणि पियुष चावलाला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. संजू सॅमसनला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

 

यंदाच्या मोसमात आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून राजस्थानने चांगली सुरुवात केली आहे. तर चेन्नईचा या मोसमातला हा पहिलाच पराभव आहे. मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा विजय झाला होता.