सुपरओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी अवघ्या ३ धावांचं आव्हान

दिल्लीला विजयासाठी अवघ्या ३ धावांचं आव्हान, थरारक सामन्यात पंजाब अपयशी

दुबईच्या मैदानावर दिल्ली आणि पंजाब यांच्यात रंगलेला सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीने भेदक मारा करत पंजाबला १५७ धावांत रोखलं. मयांक अग्रवालने ८९ धावांची बहारदार खेळी करत पंजाबला विजयाच्या जवळ आणलं. परंतू स्टॉयनिसने अखेरच्या षटकात दोन बळी घेत सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. त्यामुळे या सामन्याचा निकाल आता सुपर ओव्हरमध्ये लागणार आहे.

त्याआधी, मोहम्मद शमी आणि पंजाबच्या इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाची गाडी रुळावरुन घसरली. २० षटकांत दिल्लीचा संघ १५७ धावांपर्यंत मजल मारु शकला. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी दिल्लीला चांगलीच महागात पडली. परंतू अखेरच्या षटकांत स्टॉयनिसने फटकेबाजी करुन सर्व कसर भरून काढली. स्टॉयनिसने २१ चेंडूत ५३ धावांची खेळी करुन दिल्लीचा डाव सावरला.

नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. चोरटी धाव घेण्याच्या नादात सलामीवीर शिखर धवन एकही धाव न काढता माघारी परतला. यानंतर पृथ्वी शॉ देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. हेटमायरला बाद करुन मोहम्मद शमीने दिल्लीची अवस्था अधिक बिकट केली. ३ बाद १३ अशी परिस्थिती असताना कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी ७३ धावांची भागीदारी केली. रवि बिश्नोईने पंतला माघारी धाडत पुन्हा एकदा दिल्लीला धक्का दिला. पंतने ३१ धावा केल्या.

 

दुसऱ्या बाजूला पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करणारा कर्णधार श्रेयस अय्यरही मोठी फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. मोहम्मद शमीने ३९ धावांवर त्याला माघारी धाडलं. अखेरच्या षटकांत अष्टपैलू स्टॉयनिसने फटकेबाजी करत दिल्लीला १५७ धावांचा टप्पा गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमीने ३, शेल्डन कोट्रेलने २ तर रवी बिश्नोईने १ बळी घेतला.